International Women’s Day – 2021

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात “जागतिक महिला दिन साजरा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात  दिनांक ८/०३/२०२१ रोजी महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे “जागतिक महिला दिन” हा कार्यक्रम संध्याकाळी ४ वाजता ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

     सदर कार्यक्रमाकरीता सौ. शितल केंद्रे – मुंढे,  महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंधक शाखा, क्राईम ब्रॅंच, मुंबई ह्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त सौ. शितल केंद्रे – मुंढे  यांचे महिला सुरक्षा आणि पोलीस – “सद् रक्षणाय, खल निग्रहणाय” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

प्राचार्य डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले आणि प्रमुख पाहुणे सौ. शितल केंद्रे – मुंढे  यांची ओळख करून दिली त्याचबरोबर त्यांनी “सुनो द्रोपदी शस्त्र उठा लो, अब गोविंद ना आएंगे” ह्या सुप्रसिध्द कवितेच्या माध्यमातून आज स्त्रियांनी आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

नंतर प्रमुख अतिथी सौ. शितल केंद्रे – मुंढे  यांनी त्यांच्या भाषणात त्यांची पोलिस खात्यातील प्रदीर्घ सेवा आणि वेगवेगळ्या फौजदारी खटल्यात तपासीक अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाच्या सहाय्याने स्त्रीयांनी त्यांच्या विरुद्ध होणारे गुन्हे टाळण्यासाठी कसे जागृत राहिले पाहिजे आणि जीवन पध्दतीत काय बदल केला पाहिजे यांची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर पोलिस कश्या रीतीने महिलांविरुध्द होणारे गुन्हे रोखण्यासाठी कसे सदैव तत्पर असतात यांची माहिती देताना, त्याकरिता असलेले अनेक हेल्पलाइन क्रमांक सांगितले आणि त्याची कार्यप्रणाली स्पष्ट केली.

व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात मा. सौ. शितल केंद्रे – मुंढे  यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका कु. कृपा नाईक आणि आभार प्रदर्शन कु. संचिता करंडक (अंतिम वर्षांची विद्यार्थिनी) हिने  केले. सदर कार्यक्रम ‘झुम’ या अॅप द्वारे ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आणि त्याचबरोबर युट्यूब वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्या माध्यमातून  या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग  उपस्थित झाले. कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

Leave a comment