मराठी भाषा गौरव दिन – २०२१

भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन साजरा

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात  दिनांक २७/०२/२०२१ रोजी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे “मराठी भाषा गौरव दिन” हा कार्यक्रम संध्याकाळी ४ वाजता ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड श्री. वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सदर कार्यक्रमाकरीता अनेक अनेक सन्माननीय पुरस्कारांनी पुरस्कृत जेष्ठ कवी आणि साहित्यिक श्री. अरुण म्हात्रे हे मुख्य अतिथी म्हणून तसेच पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिना निमित्त मा. श्री. अरुण म्हात्रे यांचे “गुंजते मराठी, गर्जते मराठी” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गाजलेली मराठी मालिका “उंच माझा झोका” या मालिकेचे  श्री. अरुण म्हात्रे यांनी शब्दबध्द केलेले शीर्षकगीत दाखविण्यात आले. याच गाण्याकरीता श्री. अरुण म्हात्रे यांना झी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे.

     प्राचार्य डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना मातृभाषेचे महत्व नमूद केले आणि प्रमुख पाहुणे श्री. अरुण म्हात्रे यांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मय मंडळात मोठ्या प्रमाणात भाग घेवून, व्यक्तिमत्व विकासासाठी जे व्यासपीठ मिळाले आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांस केले.

नंतर प्रमुख अतिथी श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत प्रेरणादायक शब्दात विधी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि मराठी भाषेचे महत्व समजावून सांगतानाच मराठी भाषा टिकून राहण्यासाठी तरुण पिढीने मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्याची गरज आहे असे सांगितले. जीवनात त्यांना जे काही यश लाभले त्याच सर्व श्रेय त्यांनी मराठी भाषेला दिले. त्यासोबतच श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांचा बहारदार कवितांचा कार्यक्रम सादर केला.

पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांतदादा ठाकूर यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात मा. श्री. अरुण म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका कु. संघप्रीया शेरे आणि आभार प्रदर्शन कु. अक्षता ठाकूर, (अंतिम वर्षांची विद्यार्थिनी) हिने  केले. सदर कार्यक्रम ‘झुम’ या अॅप द्वारे ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आला आणि त्याचबरोबर युट्यूब वर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले आणि त्या माध्यमातून  या कार्यक्रमात अनेक विद्यार्थी, माजी विद्यार्थी, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग  उपस्थित झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment