First Marathi Moot Court Competition – 2020

पहीली मराठी मुट कोर्ट स्पर्धा 

महाराष्ट्रातील सर्व कनिष्ठ न्यायालयांची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून न्यायालयात युक्तीवाद कसा करावा याचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा याकरीता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात शिक्षण घेण्यार्‍या विद्यार्थ्यांकरीता दिनांक १४/०३/२०२० रोजी पहील्या महाविद्यालयीन मराठी मुट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

     सदर स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मुटकोर्ट, न्यायालयीन कामकाज, करावयाची पूर्वतयारी याची सविस्तर माहीती देण्यासाठी, दि. ११/३/२०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयातील अति. सरकारी वकील अ‍ॅड. श्री. श्रीकांत गावंड यांचे मराठी मुटकोर्ट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

     या स्पर्धेकरीता मुंबई उच्च न्यायालयातील अति. सरकारी वकील श्री. अजय पाटील यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहीले. दिपप्रज्वलनाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.  महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रमुख पाहुणे अ‍ॅड. अजय पाटील यांचे स्वागत केलं.

सदर स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना एक खटला देण्यात आला आणि विद्यार्थ्यांचे अनुक्रमांकानुसार अ‍ॅपेलंट आणि रेस्पोंडट अशी विभागणी करून, त्यांना युक्तीवाद करण्याची संधी देण्यात आली. लेखी म्हणणे, युक्तीवाद विचारात घेवून स्पर्धकांना गुण देण्यात आले. सदर स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यानी भाग घेतला आणि त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यानीसुध्दा या स्पर्धेचे अवलोकन करून अनुभव मिळविण्याचा प्रयत्न केला.

     स्पर्धकांना देण्यात आलेल्या गुणांनुसार प्रथम क्रमांक – ऋषिकेश पाटील (५ वर्ष अभ्यासक्रम चौथे वर्ष), व्दितीय क्रमांक कु. माधुरी शेलार, (३ वर्ष अभ्यासक्रम दुसरे वर्ष) आणि तृतीय क्रमांक सुयश बारटक्के (५ वर्ष अभ्यासक्रम तीसरे वर्ष) यांची निवड करण्यात आली. कु. भक्ती तेलवणे (५ वर्ष अभ्यासक्रम – तीसरे वर्ष), श्री. सुमित खोपकर (५ वर्ष अभ्यासक्रम चौथे वर्ष) आणि कु. संचिता चिमणे (३ वर्ष अभ्यासक्रम दुसरे वर्ष) यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके देण्यात आले आणि त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभागाबद्दल प्रशस्तीपत्रक देण्यात आले. या स्पर्धेचे प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन कु. संचिता करडक या विद्यार्थिनीने केले आणि स्पर्धेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment