मराठी भाषा गौरव दिन – २०२०

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात दिनांक २७/०२/२०२० रोजी जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळातर्फे “मराठी भाषा गौरव दिन” हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात सकाळी ९:३० वाजता आयोजित करण्यात आला होता. मराठी साहित्याचा मानदंड श्री. वि. वा. शिरवडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या कार्यक्रमास श्री. विलास कृष्णाजी नाईक, जेष्ठ विधिज्ञ आणि साहित्यिक, (माजी जिल्हा शासकीय अभियोक्ता आणि सरकारी वकील, रायगड),  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड. श्री.  विलास नाईक यांचे स्वागत प्राचार्या सौ. शितला गावंड यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गणेशाची मूर्ती देवून केले आणि अ‍ॅड. श्री.  नाईक यांची माहीती देताना संगितले की एक वकील असूनसुध्दा अ‍ॅड. श्री.  नाईक हे प्रतिभावंत साहित्यिक आहेत. त्याची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून “एक ना धड” या पुस्तकास महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासहीत एकूण ७ पुरस्कार मिळाले आहेत.

     कै. श्री. जनार्दन भगत याची जयंती दि. २९/०२/२०२० रोजी साजरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमात, प्रथम वर्ष एल एल. बी. चा विद्यार्थी श्री. महादेव सांडे यांनी कै. श्री. जनार्दन भगत यांच्या जीवनगाथेचे थोडक्यात वर्णन केले.

     मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अ‍ॅड. श्री.  विलास नाईक यांचे “माझी वकीली … माझी मायबोली” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सर्व कनिष्ठ न्यायालयाची भाषा मराठी असल्यामुळे वकीली करताना आपल्या मातृभाषेचा प्रभावी वापर आणि त्याचबरोबर भाषेमुळे उद्भवणार्‍या अडचणी याची माहिती, अ‍ॅड. श्री.  विलास नाईक यांच्या अनुभवाच्या शिदोरीतून विद्यार्थ्यांना मिळावी हा या व्याख्यानाचा उद्देश होता.

अ‍ॅड. श्री.  विलास नाईक यांनी थोडक्यात त्यांचा जिवनपट उलगडून सांगताना विद्यार्थ्यांना विविधरंगी अनुभव संगितले आणि साहित्याबद्दल बोलताना ते म्हणाले की वकीलाच्या आयुष्यात येणारी काही प्रकरणे अशी असतात की प्रत्येक खटल्याची एखादी कादंबरी होवू शकते. त्याच कल्पनेतून आणि अनुभवाची जोड सोबतीला असल्यामुळे साहित्य लेखन घडत गेले आणि एक ना धड या पुस्तकास मिळालेल्या पुरस्कारांमुळे हुरुप वाढला.

त्यानी विद्यार्थ्यांना सांगितले की वकील म्हणून यशस्वी व्हायचे असे तर वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि भरपूर वाचन यास खूप महत्व आहे. परंतु त्याचबरोबर जरी कनिष्ठ  न्यायालयाची भाषा मराठी असली तरी वरिष्ठ न्यायालयांचे निकाल इंग्रजी भाषेत असल्यामुळे, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान अत्यंत गरजेचे आहे.

     व्याख्यानाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे सदरात अ‍ॅड. श्री.  विलास नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सौ. संचिता चिमणे, सचिव, मराठी वाड्मय मंडळ, या विद्यार्थीनीने केले.

     सदर कार्यक्रमासाठी अनेक विद्यार्थी तसेच सहा. प्राध्यापिका सौ. प्रियांका म्हात्रे, सौ. वृशाली वानखेडे, कु. श्रुती पोटे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने तर सांगता ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

Leave a comment