Seminar on Judicial Services – As Career Option

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात शैक्षणिक आणि शिक्षणेतर कार्यक्रमांचा योग्य समन्वय साधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. दिनांक १०/१०/२०१९ रोजी रोजी विधी महाविद्यालयात “न्यायिक सेवा – एक व्यावसायिक पर्याय” – “प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व  दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या परीक्षेबद्दल  मार्गदर्शन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे मा. सौ. अनामिका मोताळे-पोरे,  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी,  वाशी – नवी मुंबई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  दीप प्रज्वलन  करून  सदर कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रमुख अतिथी सौ. मोताळे-पोरे यांचे  स्वागत केले. प्रस्ताविकात त्यांनी सांगितले की मुंबई उच्च न्यायालयात वकिली करत असताना सन २०१६ मध्ये त्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि अलिकड़ेच २०१७ मध्ये त्यांची प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी,  वाशी – नवी मुंबई येथे नेमणूक झाली आहे. त्यांचा हा प्रवास अगदी नजीकच्या काळातील असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल.

     प्रमुख अतिथी  सौ. मोताळे-पोरे  यांनी  विद्यार्थ्यांना  संबोधित केले  आणि  प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  व  दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्तर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी  परीक्षा,   त्याकरीता विद्यार्थ्यांनी  करावयाची पूर्वतयारी,  न्यायिक सेवा हे उददीष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी म्हणून कायदा अभ्यास करताना घ्यायची काळजी, अशा अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे असे सांगितले की सर्वांना न्याय मिळावा ही इच्छा प्रत्येकाची असते आणि वकिली व्यवसायाशी संबंध असणार्‍याना कायद्यातील तरतुदी माहिती असल्यामुळे अन्यायाविरुद्धची चीड काहीशी अधिक प्रमाणात असते. परंतु न्यायाधीश म्हणून प्रत्यक्ष न्याय देण्याचे काम करताना, जे समाधान मनाला मिळते हे अतुलनीय आहे. न्यायाधीशांना मिळणारे वेतन,  याबरोबरच असलेल्या सुविधा,  मिळणारा मान आणि त्या पेक्षा सुद्धा मिळणारे कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि समाजाला असलेली चांगल्या न्यायाधीशांची गरज, या मुळे विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच न्यायिक सेवा या पर्यायाचा व्यवसायिक पर्याय म्हणून विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमासाठी विद्यमान विद्यार्थ्यांसोबत अनेक माजी विद्यार्थीसुद्धा उपस्थित होते. त्याच सोबत सहा. शिक्षिका सौ. दीपाली बाबर,  सहा. शिक्षिका सौ. प्रियांका म्हात्रे,  सहा. शिक्षिका कु. श्रुती पोटे या सुद्धा उपस्थित होत्या. या व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे या सदरात प्रमुख अतिथी  सौ. मोताळे-पोरे यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन श्री. सुयश बारटक्के या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment

Contact Us

Enquiry For BCT College of Law