मराठी वाङ्मय मंडळ – उद्घाटन समारंभ

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, भागुबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयात दि. ४/८/२०१८ रोजी मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात, सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला होता.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये “मराठी वाङ्मय मंडळ” असणे अनिवार्य आहे आणि त्याव्दारे मराठी भाषेचे संगोपन आणि संवर्धन करण्याचे निर्देश आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे मंडळ विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्याकरीता एक व्यासपीठ निर्माण करून देणे  ही बाब विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे प्राचार्या डॉ. सौ. शितला श्री. गावंड यांनी पुढाकार घेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले. सदर कार्यक्रमाकरीता अनेक अनेक सन्माननीय पुरस्कारांनी पुरस्कृत जेष्ठ कवी आणि साहित्यिक श्री. अरुण म्हात्रे यांनी मुख्य अतिथी म्हणून, तर मा. श्री. श्याम पुंडे, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा, मा. श्री. गणेश कोळी, संपादक, पनवेल टाईम्स, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गाजलेली मराठी मालिका “उंच माझा झोका” या मालिकेचे श्री. अरुण म्हात्रे यांनी शब्दबध्द केलेले शीर्षकगीत दाखविण्यात आले. याच गाण्याकरीता श्री. अरुण म्हात्रे यांना झी गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. त्या नंतर टाळ्यांच्या गजरात, देवी सरस्वती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि विधी महाविद्यालयाचे स्फुर्तीस्थान स्वर्गीय भागुबाई चांगु ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन श्री. अरुण म्हात्रे यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि मुख्य अतिथी श्री. अरुण म्हात्रे यांचे स्वागत प्राचार्या सौ. शितला गावंड यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि प्रतिकचिन्ह देवून केले, श्री. श्याम पुंडे यांचे स्वागत, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवून  प्राध्यापिका सौ. सरिता समेळ यांनी केले, श्री. गणेश कोळी यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवून प्राध्यापिका सौ. संध्या बालाकृष्णन यांनी केले आणि प्राचार्या डॉ. सौ. शितला गावंड यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देवून मराठी वाङ्मय मंडळाची नवनियुक्त सचिव कु. कृतांजली म्हात्रे यांनी केले.

प्राचार्य डॉ. सौ. शितला गावंड यांनी प्रास्ताविक करताना मातृभाषेचे महत्व नमूद केले आणि प्रमुख पाहुणे श्री. अरुण म्हात्रे यांची तसेच इतर मान्यवरांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मय मंडळात मोठ्या प्रमाणात भाग घेवून, व्यक्तिमत्व विकासासाठी जे व्यासपीठ मिळाले आहे त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थ्यांस केले. या कार्यक्रमाच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर केल्या. श्री. अरुण म्हात्रे यांच्या समोर कविता सादर करायची संधी मिळाली ही अत्यंत भाग्याची गोष्ट असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी नमूद केली. मा. श्री. गणेश कोळी यांनी त्यांचे भाषणात या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. नंतर प्रमुख अतिथी श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत प्रेरणादायक शब्दात विधी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे स्वागत केले आणि मराठी भाषेचे महत्व समजावून सांगतानाच मराठी भाषा टिकून राहण्यासाठी तरुण पिढीने मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन करण्याची गरज आहे असे सांगितले. जीवनात त्यांना जे काही यश लाभल त्याच सर्व श्रेय त्यांनी मराठी भाषेला दिले. त्यासोबतच श्री. अरुण म्हात्रे यांनी त्यांचा बहारदार कवितांचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Leave a comment